मुंबई : महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि भाजपचे नेते विष्णू सावरा ( vishnu savara ) यांचे बुधवारी संध्याकाळी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांना दीर्घ आजारावरील उपचारासाठी कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सावरा हे दीर्घ आजाराने त्रस्त होते. ( Former minister vishnu savara passed away ) त्यांच्यावर अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार त्यांच्या पालघर येथील मूळ गावी वडा येथे आज (दि. १०) करण्यात येणार आहेत.
सावरा हे राजकारणात येण्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. पण, १९८० मध्ये ते आपली नोकरी सोडून भाजपचा पूर्णवेळ कार्यकर्ता बनले. त्यानंतर ते विधानसभा लढवत सलग आपल्या मतदार संघातून सलग ६ वेळा निवडून आले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्रालय सांभाळले होते. याचबरोबर त्यांनी शिवसेना – भाजप युतीच्या पहिल्या सरकारमध्येही काही महिने मंत्रीपद सांभाळले होते.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी ‘श्री विष्णू सावरा यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मितभाषी, संवेदनशील व कर्तव्यदक्ष व्यक्तित्व असलेले सावरा जनसेवेसाठी सदैव तत्पर असत.
उत्तम संघटक असलेले सावरा विधानमंडळाचे अनुभवी सदस्य होते. राज्याचे आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले होते. त्यांच्या निधनामुळे आदिवासींच्या विकासासाठी आत्यंतिक तळमळ असणार्या जीवनाचा अस्त झाला आहे. त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवतो.’ असे आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
राज्यपालांबरोबरच राज्याचे विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( devendra fadanvis ) यांनीही शोकसंदेश दिला. त्यांनी ‘भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री विष्णू सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील.’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.