अकोला – महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांची मातृसंस्था म्हणून लौकीक प्राप्त असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापन दिन आज पत्रकार भवनात उत्साहात साजरा करण्यात आला. अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक निमवाडी परिसरातील पत्रकार भवनात मराठी पत्रकार परिषदेचा ८२ वा वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात केक कापून मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या दैदिन्यमान ८२ वर्षाच्या वाटचालीचा लेखाजोगा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब यांनी मांडला.
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पत्रकार आरोग्य संरक्षण योजने अंतर्गत जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सर्व उपस्थित पत्रकार बांधवांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे संचालन जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांनी केले. शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजनेमध्ये कोरोना आजाराचा समावेश करण्यात यावा, तसेच कोरोना लस देण्याच्या प्राधान्यक्रमामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलिस यांच्या पाठोपाठ पत्रकारांचा समावेश करण्यात यावा, अशा दोन मागणीचे ठराव आजच्या सभेत पारित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. मोहन खडसे, गजानन सोमानी, राजु उखळकर, कमलकिशोर शर्मा, उमेश अलोने, दिपक देशपांडे, सुधाकर देशमुख, अजय चव्हाण, बी.एस. इंगळे, नंदू सोपले, अनिल मावळे, राजेश राठोड, नरेंद्र देशमुख, शरद गांधी, फुलचंद मौर्य, राम तिवारी, मुकुंद देशमुख आदि बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.