मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याच्या परिस्थिती लक्षात घेऊन सदर योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्केपासून १०० टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला ३१मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती अनिल परब परब यांनी दिली आहे.
त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.