मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्यास सुरुवात झाली आहे. सर्वत्र पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मुंबई, पुण्यासह इतर शहरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कडक उपाय योजना करण्याकडे पावले उचलीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा येथून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. तुमचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्यावरच तुम्हाला महाराष्ट्रात प्रवेश मिळणार आहे. या बाबतची नियमावली महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे.
दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. दिल्लीमध्ये सध्या कोरोनाची तिसरी लाट आली आहे. तेथे मोठ्या संख्येने कोरोनारुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता या चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी कोरोना टेस्ट बंधनकारक करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.
या चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांचा आरटीपीसीआर निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. त्यात ही ७२ तास आधी या टेस्टचा अहवाल घेणं बंधन कारक आहे. जे प्रवाशी विमानांनी येणार आहेत आणि त्यांच्याकडे आटीपीसीआर टेस्ट अहवाल नसेल तर त्यांना स्व:खर्चाने कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. शिवाय सर्व विमानतळांवर टेस्ट सेंटर उभारण्याच्या सुचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे स्टेशनवर देखिल हे टेस्ट सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये जर बाधीत रुग्ण आढळल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन करुन उपचार केले जाणार आहेत.
यासह जे प्रवासी रस्त्यांच्या मार्गे येणार आहेत त्यांनी आटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट सोबत ठेवणे आवश्यक आहे. तो अहवाल निगेटिव्ह असल्यावरच त्यांनी प्रवास करायचा आहे आणि या प्रवाशांनी स्वत:ची आरटीपीसीआर टेस्टही मागील ९६ तासांपूर्वी करणे आवश्यक आहे.