नवी दिल्ली : देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असल्याच्या पार्श्वभूमीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( दि. २४ ) आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेणार आहेत. ही बैठक सकाळी १०.३० ला होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पंतप्रधान ज्या राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहेत. यात प्रामुख्याने राज्यांची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी काय आराखडा आखला आहे याची माहिती घेणार आहेत. याचबरोबर पंतप्रधान लॉकडाऊनच्या शक्यतेवरही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांची ही बैठक आज सकाळी १०.३० ला होणार आहे. ही बैठक दोन टप्यात होईल असे सुत्रांनी सांगितले. पहिल्या टप्यात पंतप्रधान देशातील आठ सर्वात जास्त कोरोनाप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. तर दुसऱ्या टप्यात देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याबरोबर आणि केंद्रशासीत प्रदेशांच्या नायब राज्यपालांबरोबर कोरोनाच्या लसीचे वितरण करण्याबाबत चर्चा करतील.
कोरोनाच्या लसीचे वितरण कशा प्रकारे करता येईल आणि कोणा कोणाला प्राथमिकता द्यायची आहे हे ठरवणे हा या बैठकीचा मुख्य उद्येश आहे. असे असले तरी देशात दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या शक्यतेवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतात सोमवारी कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९१ लाखांच्या वर पोहोचली होती. यात दिवसभरातील ४४ हजार ५९ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
यामध्ये दिल्ली, केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीत एका दिवसात ६ हजार ७४६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात महाराष्ट्रात ५ हजार २०० आणि केरळमध्ये ५ हजार ७०० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.