अकोट (देवानंद खिरकर) : राज्य सरकारने महाराष्ट्रातील देवस्थानं भाविक भक्तांसाठी खुली करून दिलीत पण मंदिर उघडल्यानंतर सुद्धा गावोगावी साप्ताह करण्याकरिता रीतसर पोलीस स्टेशन मधून परवानगी मिळत नसल्याने वारकरी संप्रदायमध्ये एक प्रकारे सरकारविषयी नाराजीचा सूर दिसून येत आहे.महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अखंड हरीनाम साप्ताह पोलीस स्टेशनची परवानगी न घेता चालू आहेत पण साप्ताह नियोजन करीत असताना काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पोलीस कार्यवाहीची भीतीसुद्धा आहे.कोरोना कालखंडामध्ये गेल्या ८ महिन्यांपासून कथा,कीर्तन बंद असल्यामुळे वारकरी संप्रदायातील गायक,वादक मंडळी आणि परिस्थितीने सर्वसामान्य असलेली कीर्तनकार मंडळी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.
कथा, कीर्तन,गायन, वादन करणे हा आमचा वारकऱ्यांचा व्यवसाय नसून एक साधना आहे.पण कथा, कीर्तन,गायन,वादन केल्यानंतर साप्ताह कमिटी स्वइच्छेने जे मानधन देतात त्या मानधनामध्ये प्रपंचही चालतो आणि परमार्थही होतो. त्यामुळे आपण जर लग्नाला १०० लोकामध्ये परवानगी देत आहात,तर धार्मिक कार्यक्रमाला सुद्धा नियम अटी लावून परवानगी देण्यात यावी.वारकरी संप्रदाय हा शिस्तप्रिय संप्रदाय असूनपण दिलेल्या नियमांचे कुठेही उल्लंघन करणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो.म्हणून लवकरात लवकरमहाराष्ट्रातील गावागावामध्ये धार्मिक कार्यक्रमाला रीतसर,लवकरात लवकर परवानगी द्यावी अन्यथा येत्या २ डिसेंबर ला अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि या आमरण उपोषणाला फक्त धार्मिक संघटनांचा समावेश असून कोणत्याही राजकीय पक्षाचा आम्ही पाठींबा स्वीकारणार नाही. म्हणून आपणास विनंती आहे वारकऱ्याला उपोषणास बसण्याची वेळ येवू न देता धार्मिक कार्यक्रमाला लवकरात कर परवानगी देण्यात यावी असे विश्व वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्र अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांनी निवेदनात म्हंटले आहे.