अमरावती :- अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघाची निवडणूक होऊ घातली असून सर्वच उमेदवारांनी निवडणुकीत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यातच गुरुवारी अमरावती येथे मंत्री उदय सामंत यांचा दौरा असताना विना परवानगी शिक्षकांची सभा घेणे आ. देशपांडे यांना चांगलेच भोवले असून त्याप्रकरणी याच मतदार संघाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार संगीता शिंदे यांनी या प्रकारची तक्रार निवडणूक आयोग अर्थात निवडणूक आयुक्त यांच्या कडे केली . त्यांच्या तक्रारीची दखल घेत आचारसंहिता भरारी पथक प्रमुख रणजित भोसले यांच्या फिर्यादीवरून आ. देशपांडे विरुद्ध राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
एकीकडे कोरोनाचे कारण समोर करीत सर्व उमेदवारांना प्रशासन सभा घेण्याच्या परवाणग्या नाकारत आहे , अश्यातच मात्र विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना मात्र सूट दिली जात असल्याचा आरोप संगीता शिंदे यांनी यावेळी केला. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत श्रीकांत देशपांडे यांच्यावर आचार संहिता भंगा चा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण मागे हटणार नाही अशी भूमिका संगीता शिंदे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात घेतल्यावर शुक्रवारी दुपारी एकच खळबळ उडाली होती . त्यामुळे विभागिय आयुक्त यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश भरारी पथकाला दिले होते , त्यानुसार भरारी पथक प्रमुख रणजित भोसले यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली . याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी श्रीकांत देशपांडे विरुद्ध भांदवीच्या कलम 188, 269, 270 , महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 , आपत्ती व्यवस्थापन कायदा 51(ब) , साथीचे रोग कलम 2,3,4 अन्वये गुन्हे दाखल केले.