अकोला : राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवार दि. २३ पासून इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या पूर्व तयारीचा भाग व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व संबंधित शिक्षकांच्या कोविड चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचण्या जिल्ह्यात गुरुवार दि.१९ पासून सुरु होत असून स्वॅब नमुने संकलनासाठी दहा केंद्रांची सज्जता करण्यात आली असून शिक्षकांनी आपापल्या कोविड चाचण्या करुन अहवाल संबंधित मुख्याध्यापकांकडे जमा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
या संदर्भात आज जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्यात नियोजन तयार करण्यात आले. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देण्यात आली की, शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार इयत्ता ९वी, १० वी , ११ वी व १२ वी च्या शिक्षकांच्या चाचण्या करावयाच्या आहेत. तसेच मुख्याध्यापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही चाचण्या होणार आहेत. जिल्ह्यात अकोला तालुक्यात २२०, अकोट तालुक्यात ६७, बाळापूर तालुक्यात ५८, बार्शी टाकळी तालुक्यात ४५, मुर्तिजापूर तालुक्यात ५९, पातुर ५०, तेल्हारा ४७ व अकोला मनपाच्या चार अशा ५५० शाळा आहेत. त्यात ४००२ शिक्षक आहेत. हे शिक्षक इयत्ता ९ वी ते १२ वी या वर्गांना शिकवणारे आहेत, तसेच २००० शिक्षकेतर कर्मचारी आहेत. या सर्वांची कोविड चाचणी करता यावी यासाठी अकोला शहरात भरतीया हॉस्पिटल व आयएमए दवाखाना, अकोट येथे नागरी आरोग्य केंद्र, गोलबाजार व ग्रामिण रुग्णालय, बाळापूर येथे ग्रामिण रुग्णालयात, बार्शी टाकळी येथे ग्रामिण रुग्णालयात, मुर्तिजापूर येथे ग्रामिण रुग्णालय व हेंडज येथील आयटीआय, पातुर येथे आयुर्वेद महाविद्यालय, तेल्हारा येथे ग्रामिण रुग्णालय या ठिकाणी चाचण्यांसाठी नमुने संकलनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या केंद्रांवर त्या त्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी द्यावयाची आहे. तसेच सकाळी १० ते १२ या वेळात शिक्षकांनी आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक देऊन नोंदणी करावयाची आहे. अकोला शहरातील शिक्षकांची संख्या लक्षात घेता दि.१९ रोजी मुख्याध्यापक व निम्मे शिक्षक / कर्मचारी व दुसऱ्या दिवशी उर्वरित कर्मचारी यांनी नोंदणी करुन आपापले नमुने चाचणीसाठी द्यावयाचे आहेत, असे निर्देश देण्यात आले. या संदर्भातील शाळानिहाय नियोजन हे शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले.
जिल्ह्यात इयत्ता ९ वी चे २९ हजार ३७६, इयत्ता दहावी चे ३१ हजार ४१०, इयत्ता ११ वी चे २२ हजार ४६१, इयत्ता १२ वी चे २५ हजार ४०५ असे एकूण एक लाख आठ हजार ६५२ विद्यार्थी आहेत.