नेकनूर (जि. बीड) : नेकनूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येळंब (घाट) परिसरात एक २२ वर्षीय तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळून आली. पुण्यावरून गावी परतत असताना मध्येच तिच्या प्रियकराने आपल्या प्रियसीला पेट्रोल, ॲसिड टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या गाडीतून तिला उपचारासाठी बीडच्या रूग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.
‘पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील सावित्रा डिंगबर अंकूरवर (वय २२) ही गावातीलच अविनाश रामकीसन राजुरे (वय २५) याच्यासोबत गेल्या वर्षभरापासून पुण्यात रिलेशनशिप मध्ये राहत होती. शुक्रवारी रात्री दोघेही पुण्याहून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान बीड तालुक्यातील येळंब (घाट) परिसरात एका खडी क्रेशरजवळ सदरील जोडपे मुक्कामास थांबले. पहाटेच्या सुमारास प्रियकराने आपल्या प्रियसीचा सुरवातीला गळा दाबून, अॅसीड टाकले. यानंतर पेट्रोल टाकून अमानुषपणे आग लावली आणि तेथून आरोपी पसार झाला.
पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी दोनपर्यंत सदरील तरुणी तडफडत राहिली. दुपारी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची तिच्यावर नजर पडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी पोलिस गाडीतून नेकनुर आणि नेकनुरमधुन ॲम्बुलन्सने बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
यानंतर आरोग्य प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ॲसिड हल्ला आणि पेट्रोलने ४८% टक्के शरीर भाजले असुन प्रकृती स्थिर आहे बोलण्यात स्थितीत असल्याने पीडितेच्या जवाबावरून आरोपी अविनाश रामकीसन राजुरेवर नेकनूर ठाण्यात क ३०७ / ३२६ A गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र रविवारी सकाळी तिचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. यामागे नेमके काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून नेकनुर पोलिस आरोपीच्या शोधात आहेत सदरील प्रकरणाचा एपीआय लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास जाधव करत आहेत.