मुर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम पोही येथील विकास कामासंदर्भात पंचायत समितीला जिल्हा परिषदकडे कृती आराखडा पाठविण्यासाठी येथील सरपंच किशोर नाईक यांनी वारंवार विनंती करूनही सदर प्रस्ताव पाठविण्यासाठी विस्तार अधिकारी बि.पी.पजई यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली,असा आरोप करत सरपंच किशोर नाईक यांनी ९ नोव्हेंबर रोजी ५ वाजताच्या दरम्यान पंचायत समिती येथे अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
रोहणा बँरेज या प्रकल्पात पोही येथील अनेक शेतकऱ्यांची शेती गेली आहे.या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.गावाचे पुनर्वसन करायचे असल्याचे कारण पुढे करून या गावाचा विकास कृती आराखडा पाठविण्यास पंचायत समिती स्तरावर विस्तार अधिकारी(पंचायत) बि.पी.पजई हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सरपंच किशोर नाईक यांनी केला आहे.शासनाने अत्यावश्यक विकास कामे थांबविता येणार नसल्याचे २६ मे २००५ रोजी एका परिपत्रकात नमूद केले आहे.तरीसुद्धा या गावाचे नाव विकास कृती आराखड्यातून वगळण्यात आले होते. यासाठी सरपंच किशोर नाईक यांनी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांना व विस्तार अधिकारी पजई यांना वारंवार विनंती केली असता विविध कारणे सांगून टाळाटाळ करण्यात येत आहे.यासाठी विस्तार अधिकारी पजई यांनी अनेक अटी समोर केल्या.विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी व पाठबंधारे विभागाचे नाहरकत प्रमाणात आणण्यासाठी वेठीस धरले,तेही प्रमाणात सरपंचांनी विस्तार अधिकाऱ्याकडे सादर केले.तरीही आराखडा जिल्हा परिषद अकोला यांना पाठविण्यात येत नसल्याने गावाचा विकास थांबला आहे.त्यामुळे कंटाळून टोकाची भूमिका घ्यावी लागल्याने सरपंच किशोर नाईक यांनी सांगितले.
सदर प्रस्ताव पाठविण्यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविला होता.यावर त्यांनी उप–जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याकडे मार्गदर्शन मागितले व यासाठी परवानगी दिली हा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच तयार करण्यात आला असून,सुट्टी असल्याने तो पाठविता आला नाही.