मुंबई : प्लॅस्टिकप्रमाणेच मोठ्या आवाजाच्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना केली आहे.कोरोनाचे संकट लक्षात घेता अनेक राज्यात फटक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील यावर बंदी घालावी,अशी मागणी सत्यजित तांबे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
सत्यजित तांबे यांनी ट्विट करत म्हटले की, “पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती, कृपया मोठे आवाज करणाऱ्या व धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पध्दतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशिर्वाद देतील”. यावर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यानिमित्त सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यंदा नागरिकांनी साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
कोरोनाचे सावट यंदाच्या दिवाळीवर देखील आहे. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती आहे. तसेच फटाक्यांच्या धुरामुळे कोरोना रुग्णांना त्रासही होऊ शकतो. त्यामळे खबरदारी म्हणून दिल्ली आणि राजस्थान आदी राज्यांत यंदा दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यातही फटाक्यांवर बंदी आणावी अशी मागणी आता केली जात आहे.