मुंबई : अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी वादाच्या भोवर्यात अडकलेल्या अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी अपूर्ण राहिली. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने शनिवारी दुपारी 12 नंतर दिवसभर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी अटक केली आहे. अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला आव्हान देत अर्णब यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर शुक्रवारी दिवसभर सुनावणी झाली. अर्णब गोस्वामींच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. हरिश साळवे यांनी बाजू मांडताना पोलिसांच्या कारवाईलाच आक्षेप घेतला.
राज्य सरकारचे हे षड्यंत्र आहे. त्यात अर्णब यांचा बळी दिला जात असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी पोलिसांच्या समरी अहवालानुसार खटला बंद करण्यात आला. त्याला आव्हानही देण्यात आले नाही. असे सताना पुन्हा तपास सुरू करण्यासंदर्भात न्यायालयाचा आदेश मिळवला नाही. तरीही पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. पोलिसांनी केलेली कारवाई बेकायदा असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अर्णब गोस्वामी यांना लक्ष्य करून विविध प्रकरणांत गुंतविण्याचे हे षड्यंत्र असल्याचे अॅड. साळवे म्हणाले.
अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनासाठी केलेल्या अर्जावर रायगड पोलिसांना उत्तर देण्यासाठी निश्चित कालावधी दिला नव्हता. त्याचा गैरफायदा घेतला जात होता. त्यामुळे तेथील अर्ज मागे घेऊन उच्च न्यायालयात अर्ज केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून जामीन द्यावा, अशी विनंती केली.