मंबई : ऑनलाईन वर्गांना शालेय शिक्षण विभागाने 14 दिवसांची दिवाळी सुट्टी शुक्रवारी जाहीर केली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही ही सुट्टी मिळणार असल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे. यापूर्वी 5 दिवसच सुट्टी दिल्याने शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारपासून म्हणजेच 7 ते 20 नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्टी राहणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वी शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार 12 ते 16 नोव्हेंबर अशी 5 दिवस सुट्टी देण्यात आली होती. आता सुट्टीचा कालावधी वाढवून तो 14 दिवसांचा करण्यात आला आहे.
नववी ते बारावी वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली तर हे चार वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू केले जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
बारावीच्या परीक्षा मे महिन्यात शक्य
शाळा बंद असल्या तरी शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घ्याव्या लागतील.23 नोव्हेंबरपासून वर्ग सुरू झाले तरच मे महिन्यात परीक्षा घेणे शक्य होईल. मे महिन्यानंतर पावसाळा सुरू होतो. या कालावधीत परीक्षा घेणे कठीण जाईल, असेही गायकवाड म्हणाल्या. दहावी आणि बारावी परीक्षा वेळापत्रकासंदर्भात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन-अध्यापन प्रक्रिया व परीक्षा पार पाडण्यासाठी सरकार सक्षमपणे विचार करेल, असेही
त्या म्हणाल्या.