दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावी परिक्षा आगामी मे महिन्यांपूर्वी शक्य नसल्याचे म्हटले आहे. एका वृत्तवाहिनी बोलताना वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही याची काळजी घेत मे महिन्यात परिक्षा घेण्यात याव्यात असा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवण्यात आला असल्याची माहिती गायकवाड यांनी यावेळी दिली.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार मे महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहे, कारण जर त्यापुढे परीक्षा गेल्या तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाळा सुरु होईल, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. त्यानंतर निकाल यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होऊ शकतो ते आम्हाला नको, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णयही शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये शाळा सुरु होणं गरजेचे आहे असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
याचसोबत इयत्ता पहिली ते आठवी शाळा सुरु करण्याची कोणतीही घाई नाही, पहिल्या टप्प्यात ९ वी ते १२ वी शाळा सुरु केल्या जातील, बाकींच्याचे ऑनलाईन वर्ग सुरुच राहतील. शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. एकदा शाळा सुरु झाल्या तर पुन्हा बंद होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. आमच्यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता आहे. परंतु शैक्षणिक वर्षही वाया जाऊ नये याची तयारी केली जात आहे. दिल्ली, आंध्र प्रदेशात ज्याप्रकारे शाळा सुरु झाल्यानंतर कोरोना पसरला तसे महाराष्ट्रात होऊ नये यादृष्टीने पावले उचलली जात आहेत असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.