भारतातील व्हॉट्सअॅप युजर्सना आता आणखी एक नवीन खुशखबर मिळाली आहे. आता व्हॉट्सअॅपवरुन आर्थिक देवाण-घेवाण करता येणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय या कंपनीने गुरूवारी (दि.५) रोजी यासाठी व्हॉट्सअॅपला परवानगी दिली आहे.
मागील काही वर्षांपासून व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठविण्याची सुविधा सुरू होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय या कंपनीने UPIवर आधारित पेमेंट व्यवस्था बनवली आहे. या सेवेनुसार आर्थिक व्यवहारातील देवाण-घेवाण होणार आहे. व्हॉट्सअॅप युजर्सना घरबसल्या हातात पैसे मिळणार आहेत. याआधीही या प्रणालीची चाचणी केली होती.
भारतात व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये पेमेंटचा पर्याय उपलब्ध असल्यास हे सोपे होणार आहे. जर हा पर्याय उपलब्ध नसल्यास, व्हॉट्सअॅप अपडेट करून हा पर्याय आपण मिळवू शकतो. तसेच व्हॉट्सअॅप पेमेंटचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याला डेबिट कार्ड लागणार आहे. हे डेबिट कार्ड UPI ला सर्पोट करणार आहे. यानंतर खाली आलेल्या पर्यायापैकी बँकेची निवड करून आपली माहिती भरावी लागणार आहे.
फेसबुकचे इंडिया हेड अजित मोहन यांनी याविषयी सांगितले की, ‘भारतात व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवण्याचे प्रात्यक्षिक आले आहे. आता व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवू शकणार आहेत. या सेवेबद्दल आम्ही उत्साही आहोत की, कंपनी भारतात डिजिटल पेमेंट करण्यातही योगदान देणार आहे.’
व्हॉट्सअॅपने आपल्या निवेदनात म्हटले की, ‘आजपासून देशभरात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पैसांची देवाण- घेवाण करता येणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठविणे मेसेज पाठवण्या इतके सोपे असणार आहे.’
रायटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपने पेमेंट सेवेसाठी पाच मोठ्या बँकांसोबत (ICICI bank, HDFC bank, Axis bank, SBI आणि JIO Payments bank) करार केला आहे. याशिवाय व्हॉट्सअॅपवरून व्हॉट्सअॅपलाच पैसेच येणार नाही तर UPI सिस्टीमला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अॅपवर पैसे पाठविता येणार आहे. यातील विशेष म्हणजे, समोरची व्यक्ती व्हॉट्सअॅप पेमेंटचा वापर करत नसेल तरीही त्याला पैसे पाठविता येणार आहेत. तसेच ही सुविधा सुरक्षित असल्याचे ही सांगितले आहे.