जगातील सर्वात जुन्या लोकशाही देशामध्ये मंगळवारी राष्ट्रपतीपदासाठीची अंतिम टप्प्यातील निवडणूक संपन्न होत आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेद्वार जो बिडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार तसेच विद्यमान राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही लढत होत आहे. अमेरिकेतील वेळेनुसार सकाळी ६ पासून तर भारतीय वेळेप्रमाणे दुपारी ३.३० पासून प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तसेच भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी ६.३० पर्यंत ही मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. अमेरिकेतील मतगणना तेथील प्रत्येक राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मंगळवारी रात्रीपासून अर्थात भारतात बुधवारपासून सुरु होईल.
फ्लोरिडा, विस्कोंसिन, पेनेसिल्वेनिया सारख्या निर्णायक ठरणाऱ्या राज्यांमधील मतगणना आठवड्यापर्यंत लांबू शकते. अमेरिकेचा निवडणूक कार्यक्रमापासून ते राष्ट्रपतींच्या शपथग्रहण समारोहापर्यंत सर्वकाही नियोजित असते. नोव्हेंबरमधील पहिल्या मंगळवारी (यंदा दि.३ नोव्हेंबर) मतदान होत आहे. तर राष्ट्रपती २० जानेवारी रोजी शपथ घेतात. या दोन्हींच्यामध्ये निकालास वेळ लागला किंवा कोणी आक्षेप घेतला अथवा निकाला विरोधात कोर्टात गेले तर त्याचा कोणताही परिणाम नियोजित कार्यक्रमांवर पडत नाही.
मतदानाच्या आदल्या दिवशी पर्यंत राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांनी मतदारांना प्रभावित करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले. कोरोना संकटाशी संपूर्ण अमेरिका झुंज देत असताना या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोन्ही उमेदवार आपल्याला देश चालविण्याची संधी देण्याची विनंती करीत आहेत. अमेरिकेतील ९ कोटी ३० लाख मतदारांचे यापूर्वी मतदान पार पडले आहे.