कोरोना कालावधीमध्ये वाढीव वीजबिले कमी करण्याबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होईल, अशी शक्यता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. तसेच मुंबईत यापुढे बत्ती गुल होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट दिल्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते.
आयलँडिंगच्या डिझाईनच्या तंत्रज्ञानात वेळोवेळी बदल होत गेले आहेत. मात्र सध्याचे अद्ययावत तंत्रज्ञान यामध्ये आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही डॉ. राऊत यावेळी म्हणाले.
राज्यात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी वीज सवलती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सूत गिरण्या, कापड गिरण्या यांनाही सवलतीच्या दराने वीजपुरवठा करणे, तसेच प्रलंबित वीज जोडण्यांचे अर्ज गतीने कशा प्रकारे निकाली काढता येतील त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. लवकरच कृषीपंप वीजजोडणी धोरणाबाबत निर्णय होणार असून त्यामुळे प्रलंबित कृषीपंप वीज जोडण्यांचे प्रश्न मार्गी लागतील, असेही ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले.