हिवरखेड(धिरज बजाज)-
गुलाबी बोंडअळी मुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात बोंडअळीचा प्रकोप सर्वात जास्त तेल्हारा आणि अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
बोंड अळीने तेल्हारा आणि आकोट तालुक्यामधील हिवरखेड तळेगाव, कार्ला बु, एदलापूर खैरखेड सह शेकडो गावातील हजारो शेतकऱ्यांची हरित स्वप्ने कूरतडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पहावयास मिळत आहेत.
आतापर्यंत शेतकऱ्यांना 25 ते 30 हजार रुपये प्रति एकरी खर्च आलेला आहे. परंतु पीक जोमात असताना आणि वेचणीला आला असताना गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे एकरी 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.
सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
गेल्यावर्षी मर रोगाने कपाशीवर हैदोस घातला होता, परंतु त्यावर शासनाकडून पाहणी आणि अभ्यास झाला, यावर्षी बोंड अळीने उभ्या पिकावर नागर फिरवायची वेळ शेतकऱ्यावर आणली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाहणे आणि अभ्यासासोबतच अंमलबजावणी व आर्थिक मदत देण्याची सुद्धा गरज आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कपाशीचे पीक जोमात येत नाही. जेमतेम उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे.
कोणत्याही फवारणी ने सुद्धा बोंडअळी नियंत्रणात येत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
आता बोंडअळी मुळे उभ्या पिकांवर नागर फिरविण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली असून खैरखेड येथील शेतकरी गजानन मेतकर यांना चक्क पंधरा एकर वरील कपाशी पिकावर ट्रॅक्टरद्वारे नागर फिरवावा लागल्याची दुःखदायक घटना घडली आहे.
बोंड अळीच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशा आशयाचे निवेदन घेऊन शेतकऱ्यांनी थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी अकोला यांचे उंबरठे झिजविले आहेत. आता शासन शेतकऱ्यांसाठी कोणते पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया
शेतीच्या मशागतीला अतोनात खर्च आल्याने मी कपाशीचा विमा काढू शकलो नाही. बोंडअळी मुळे पंधरा एकर कपाशीचे पीक नाईलाजास्तव नेस्तनाबूत करावे लागले. शासनाने विमा न काढू शकलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी
गजानन मेतकर, शेतकरी खैरखेड ता अकोट.
यावर्षी तरी चांगले पीक येऊन सर्व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी आशा होती. परंतु बोंडअळीने कपाशीच्या रूपाने शेतकऱ्यांची हरित स्वप्ने कूरतडण्याचे काम केले आहे.
सुलताने गुरुजी, शेतकरी, कार्ला बु, ता. तेल्हारा.