मुंबई :
लॉकडाऊनमध्ये एसटीचे मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार थकले आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं २ हजार कोटीचं कर्ज काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. सध्या कर्मचाऱ्यांना वेतन देणं प्राथमिक कर्तव्य आहे. त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देण्यासाठी कर्ज काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे परब यांनी म्हटले आहे.
पगारासाठी ९०० कोटींची गरज आहे. त्यासाठी कर्ज काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांसोबतच प्रवाशांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे.