मुंबई : काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महिलांना दिलासा देत लोकल ट्रेनच्या प्रवासाची मुभा दिली आहे.तर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अद्यापही लोकलचे दरवाजे बंदच आहेत.अशावेळी सर्वांना लोकल प्रवासाची मुभा केव्हा मिळणार, असा प्रश्न सातत्याने सर्वसामान्य मुंबईकर विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढील काही दिवसांत लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करणार असल्याचे संकेत दिले आहेत. एका प्रवाशाच्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी सरकार यावर निर्णय घेणार असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळणार असल्याचे म्हटले आहे.
प्रवाशाने ट्वीट करत म्हटले होते की, “याआधी महिलांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्यांना परवानगी का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणे हा खूप मोठा अन्याय आहे, असे ट्वीट करत संबंधित प्रवाशाने सीएमओ कार्यालय आणि विजय वडेट्टीवार यांना देखील टॅग केले होते. यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेऊ. यासंबंधित चर्चा झाली असून मुंबईकरांना लवकरच दिलासा मिळेल”.
दरम्यान, कोरोनामुळे मार्च महिन्यापासून मुंबईची लाईफलाईन समजली जणारी लोकल सेवा ठप्प आहे. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच आता महिलांना देखील लोकल प्रवास करण्याची मुभा आहे. पंरतु सर्वांना लोकल प्रवास करू द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. शिवाय दिवाळी सारखा मोठा सण देखील तोंडावर आलेला असताना लोकल प्रवासाच्या मागणीने जोर धरला आहे. अशातच विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ट्वीटमुळे दिवाळी आधी सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू होण्याची चिन्हे आहेत.