अकोला,दि. 28(जिमाका)- नेहरु युवा केन्द्र संगठनच्या मार्गदर्शीकेनुसार सन 2020-21 करीता कार्यक्रम आराखड्यास निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या उपस्थितीत मंजूरी देण्यात आली. यावेळी नेहरु युवा केन्द्राचे जिल्हा युवा समन्वयक महेशसिंह शेखावत, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, जिल्हा ग्राम विकास विभागाचे गजानन माने, समाज कल्याण विभागाचे एम.जी. खारोडे, भारत स्काऊट आणि गाईड कार्यालयाच्या सोनिया सिरसाट, कौशल्य विकास रोजगार व उद्योग विभागाचे निशिकांत पोफळी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नेहरु युवा केंद्राचे नियमित कार्यक्रम कृती योजना आराखडा मंजूरीसाठी आज लोकशाही सभागृहात जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची सभा घेण्यात आली. त्यावेळी कार्यक्रम आराखड्यास मंजूरी देवून नेहरु युवा केन्द्राव्दारे सन 2020-21 या आराखड्यातून रोजगार मार्गदर्शन शिबीर, आपत्ती निवारणकरीता तालुकास्तरावर मदत व बचाव पथके तयार करणे, महिला समस्या विषयक कार्यक्रम, कोरोनासबंधी जनजागृती, क्रीडा प्रशिक्षण व स्वच्छता अभियान या सारखे उपक्रमाअंतर्गत कार्यक्रम राबविण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी संबंधीताना निर्देश दिले. हे कार्यक्रम वेबीनारव्दारे ऑनलाईन पद्धतीने राबविण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
प्रस्तावना महेशसिंह शेखावत यांनी तर आभार प्रदर्शन उदय देशमुख यांनी केले. यावेळी युवा मंडळाचे प्रमुख विशाल रांखोडे, नाझीया खान, विलास वानखडे, नेहरु युवा केन्द्राचे राष्ट्रीय युवा स्वंयसेवक पूजा गुंटीवार, वैष्णवी गोटमारे, शितल ठाकरे यांची उपस्थिती होती.