अकोला(प्रतिनिधी)- काही दिवसांपूर्वी जवाहर नगर जवळील एका बगिच्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीला फूस लावून छेड काढण्याचा प्रयत्न एका अनोळखी इसमाने केला होता. या अनोळखी इसम विरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. अवघ्या सहा दिवसाच्या कालावधीत या अनोळखी इसमाला जेरबंद करण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.घटनेची हकीकत अशी की, हा अनोळखी इसम रोज बगिच्यात येत असल्याने मुलीची थोडीफार ओळख झाली होती. घटनेच्या दिवशी या इसमाने मुलीला सांगितले की, कुणी तरी तुझी सायकल घेवून पळाला आहे. माझ्या गाडी वर बस चोराला पकडू, म्हणून मुलगी गाडीवर बसली.आणि आरोपी इसमाने तिला एका निर्जन स्थळी नेवून, तिच्या सोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुलीने आरडा ओरड केल्याने इसम पळून गेला. घरी येवून मुलीने संपूर्ण घटना आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी अनोळखी इसमा विरुद्ध सिव्हील लाईन पोलिस ठाणे येथे तक्रार नोंदविली.
पोलिसांनी तपास चक्रे फिरवून, सहा दिवस परिसरातील सुमारे शंभरच्यावर cctv सीसीटीव्ही तपासले. यानंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर रोजी फिर्यादीच्या तक्रारी वरुन अनोळखी ईसमा विरुध्द कलम ३५४ अ,ब.ड, ३६६ अ, व ८,१ पाक्सो अक्ट अन्वये गुन्हा नोंद करुन तपास हाती घेण्यात आला होता.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी पोलिस उपनिरिक्षक सागर हटवार यांचे नेतृत्वात तपास पथके तयार केली. पथकांनी गुन्हयातील अनोळखी ईसमा बाबत माहिती काढुन २४ ऑक्टोबर रोजी आरोपीस निष्पन्न करण्यात येवून, त्याला अटक केली.मात्र,अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पोलिसांनी अद्याप जाहीर केलेले नाही.ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राउत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, उपनिरिक्षक, छाया वाघ, सागर हटवार, सहाय्यक उपनिरिक्षक जयंत सोनटक्के यांनी कारवाई केली. तपास पथका मध्ये प्रमोद डोईफोडे, अश्विन मिश्रा, किशोर सोनोने, वसिमोद्दीन, शक्ती कांबळे, लीलाधर खंडारे, रवी पालीवाल, विशाल मोरे, संदीप टाले, भाग्यश्री मेसरे यांचा समावेश आहे.