मुंबई : अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला एकनाथ खडसे हे परवा शुक्रवारी दुपारी दोन वाजता अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.आज पत्रकार परिषद घेत जयंत पाटलांनी एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली.एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर आज भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवला असून, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.एकनाथ खडसे हे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसे हे भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय मंगळवारी रात्री घेणार असल्याचे वृत्त मुंबई नगरीने काल दिले होते.राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर खडसे यांनी आज सकाळी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे पाठवला आहे.खडसे यांच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे.तर राष्ट्रवादीला मोठे बळ मिळणार आहे.खडसे यांनी भाजपसोबत गेली चार दशके काम केले आहे.गोपीनाथ मुंडे यांच्यासह काम करून त्यांनी भाजपला बळ दिले. मात्र गेली काही वर्षे त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो महाराष्ट्रातील लोकांनी पाहिला.त्यामुळे त्यांनी पक्षाचा त्याग केला,असे एकनाथ खडसे यांनी आपल्याला सांगितले असल्याचे जयंत पाटील म्हणाले. तसेच अनेक वर्षांचा अनुभवी नेता राष्ट्रवादीत येत आहे.त्यामुळे पक्षाचे बळ वाढेल,असे त्यांनी म्हटले. एकनाथ खडसे यांच्यासह आणखी कोणकोण पक्षप्रवेश करणार याबाबत अद्याप चर्चा झाली नाही. आज केवळ त्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली जात असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये विशेषकरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेली नाराजी उघड आहे.यावर त्यांनी अनेकदा भाष्य देखील केले.त्यामुळे नाराज खडसे आता आपली कात टाकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती.लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या अनेक दिवस रंगल्या होत्या.जळगावमध्ये खडसेंच्या समर्थकांनी देखील त्यांचे पोस्टर लावले ज्यावर कमळचे चिन्ह गायब होते.त्यामुळे खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात होता. आज अखेर त्याची अधिकृत घोषणा झाली असून शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबरोबर भाजपाचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट आजच्या पत्रकार परिषदेत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.खासगीत बऱ्याच जणांनी खडसेंबरोबर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जे खडसेंचे नेतृत्व मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही असे लोक राष्ट्रवादीत दाखल होतील.राज्यात कोरोनाचे संकट असल्याने या काळात विधानसभेची निवडणूक घेणे परवडणार नाही त्यामुळे १० ते १२ आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार येत्या काळात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला.