मुंबई :
एसटीच्या आगारात किंवा स्थानकात गाडीची वाट पाहत तिष्ठत उभे राहिलेल्या प्रवाशांचे हाल येत्या काळात बंद होणार आहेत. कारण प्रवाशांना आता गाडीचा ठावठिकाणाच बसल्या जागी समजणार आहे. त्यासाठी एसटीच्या सर्व गाड्यांमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा(व्हीटीएस) बसविण्यात येत असून एखादी गाडी नेमकी कुठपर्यंत पोहोचली याचा माग काढता येणे शक्य होईल. गाडीची वाट पाहणार्या प्रवाशांची अस्वस्थता कमी करण्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही या यंत्रणेचा उपयोग होणार आहे.
एसटी गाड्यांचा वक्तशीरपणा वाढून वेळापत्रक सुधारावे,प्रवाशांचा बसची सद्यस्थिती समजण्यास मदत व्हावी तसेच बसचा अपघात झाल्यास त्याची माहिती महामंडळाला त्वरित मिळावी यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्हीटीएस प्रणालीला शुभारंभ केला होता. नाशिक एसटी आगारातील गाड्यांवर हा प्रयोग सुरू झाला.
प्रयोग सुरू असतानाच राज्यातील एसटीच्या अन्य विभागातही प्रणाली बसवण्याचे काम सुरू करण्यात आले.मार्च 2020 पर्यंत सर्व बसगाड्यांना व्हीटीएस बसवून प्रवाशांच्या सेवेत आणली जाणार होती, परंतु करोनाकाळात हे काम पूर्णपणे थांबले. आता या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. महामंडळाच्या ताफ्यातील 18 हजार बसपैकी 16 हजार बसेसना ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यत ही यंत्रणा पूर्णपणे लागून तयार होणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून ही प्रणाली प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामध्ये साध्या, निमआराम, वातानुकूलित बसचा समावेश आहेत. एसटीकडून ही सुविधा मोबाईलवरही देण्यात येणार आहे.
अपघात झाल्यास ठावठिकाणा समजणार
एखाद्या बसला अपघात झाला तर त्यावेळीही व्हीटीएस यंत्रणेची एसटीला मदत होईल. या बसचा ठावठिकाणा समजल्यानंतर तत्काळ मदतकार्य पोहोचवता येईल. तसेच या बसची वाट पाहणार्या अन्य स्थानक किंवा आगारांतील प्रवाशांनाही त्याची माहिती देऊन अन्य पर्याय दिला जाईल.
प्रवाशांच्या सोयीचे
या यंत्रणेमुळे एखाद्या नियोजित आणि अधिकृत थांब्यावर बस न थांबल्यास त्याची माहितीही महामंडळाला समजेल आणि त्यानुसार कारवाईदेखील चालक व वाहकांवर करता येईल. या सेवेचा फायदा प्रवाशांनाही मिळणार आहे. एसटीच्या 609 बस स्थानक व आगारात इलेक्ट्रॉनिक बोर्डही बसवण्यात आले आहेत.