अकोला,दि.२० (जिमाका)- ग्रामीण भागात प्रत्येक गावातील गुरांना चरण्यासाठी आरक्षीत करण्यात आलेल्या चराई क्षेत्रावर अतिक्रमणांबाबत स्थानिक ग्रामपंचायतींनी तात्काळ कारवाई करावी व चराई क्षेत्रावर कुरणे विकसित करुन जनावरांना चारा उपलब्ध करावा. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
येथील जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सभेस जितेंद्र पापळकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने तसेच प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे डॉ रवींद्र कोल्हे , विशाल बोरे, विजय जानी, भूषण पिंपळगावकर, सुधीर कडू, गोपाल नारे, सचिन आयवळे, राजेंद्र तिहिले, डॉ. मिलिंद निवाने हे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
यावेळी डॉ. रवींद्र कोल्हे यांनी गायरान जमिनी अतिक्रमणमुक्त करणे बाबतचा मुद्दा उपस्थित केला. ग्रामिण भागात पशुपालकांना जनावरे पोसण्यासाठी उपयुक्त असलेल्या चराई क्षेत्राचा लाभ मिळण्यात अतिक्रमाणांमुळे अडचणी निर्माण होतात, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर या जमिनी त्या त्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असतात. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अशा प्रकरणांवर कारवाई करुन जमिनी अतिक्रमण मुक्त कराव्या. अशा जमिनीवर कुरण विकसित करुन गवत, चारा पिकांची लागवड करावी व गावातील गुरांना चारा उपलब्ध करुन द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
सदस्य भूषण पिंपळगावकर व विजय जानी यांनी जनावरांच्या अवैध वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जिल्ह्यात प्राणी वाहतुकीसंदर्भात दाखल गुन्ह्यांबाबत वाहतुकदार वा वाहनचालकांवर गुन्हे दाखल करतानाच मुळ मालकांवर गुन्हे दाखल होणे अपेक्षित असते, अशा कारवाईचा तपशिल येत्या बैठकीत पोलीस विभागाने सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. विशाल बोरे यांनी जनावरांना टॅगिंग करुन लसीकरण करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर माहिती देण्यात आली की, हे लसीकरण सध्या सुरु आहे. सध्या राबविण्यात येत असलेल्या लम्पी चर्मरोग लसीकरण व लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाची गति वाढवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या कार्यक्रमास पशुपालकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे सांगितले. यावेळी बैठकीस उपस्थित स्नातकोत्तर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ .अनिल भिकाने यांनी व प्रा.डॉ. मिलिंद थोरात यांनी लसीकरण कार्यक्रम आणि मोकाट कुत्रे निर्बिजीकरण कार्यक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली.
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत बोलतांना जिल्हाधिकारी पापळकर यांनी निर्देश दिले की, मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी अकोला महानगरपालिकेने स्नातकोत्तर पशुवैद्यकीय महाविद्यालयाशी केलेल्या सामंजस्य कराराची संपलेली मुदत पुन्हा वाढवुन घ्यावी व कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम सुरु ठेवावे. जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. तुषार बावने यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी अशासकीय सदस्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.