अकोला (प्रतिनिधी)-शासनाने खरीप हंगाम २०२० मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून जिल्ह्यात HDFC इर्गो या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला असुन खरीप हंगामातील पेरणी केलेल्या सोयाबीन, ज्वारी इत्यादी पिकांची काढणी सुरु झालेली आहे.
आता प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२० अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसानीबाबत (Localized Calamities) तसेच काढणीपश्चात नुकसान(Post Harvest Losses) इत्यादी मुळे जर पिकांचे नुकसान झाले असेल तर घटना घडल्यापासून ७२ तासाचे आत प्रथम प्राधान्याने Crop Insurance App द्वारे शेतकऱ्यांनी पूर्वसूचना नोंदविणे गरजेचे आहे. Crop Insurance App द्वारे शेतकऱ्यांनी पूर्वसूचना कश्या पद्धतीने नोंदवायची याबाबत वाशीम जिल्ह्याने प्रसारित केलेली YouTube लिंक (https://youtu.be/OrjAF2XgPZ8) अधिक माहितीकरिता देण्यात येत असुन त्यानुसार शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे व काढणीपश्चात नुकसान झाले असल्यास कंपनीला पूर्वसूचना दयावी किंवा १८००२६६०७०० या टोल फ्री नंबरचा वापर करावा. जर Mobile App द्वारे किंवा टोल फ्री नंबरवर पूर्वसूचना देणे शक्य न झाल्यास संबंधित बँक अथवा आपले गावचे कृषी सहायक/तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना दयावी. संबंधित बँक व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांनी सदरची माहिती संबंधित विमा कंपनीस तत्काळ पुढील ४८ तासात दयावी असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.