मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती.एकनाथ खडसे यांच्याकडून या वृत्ताचे अनेकदा खंडन देखील करण्यात आले.पण आता एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मनाला जात असल्याची माहिती समोर आली आहे.लवकरच राष्ट्रवादीकडून खडसेंच्या पक्षप्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची चर्चा आहे.
स्वपक्षात आपल्यावर झालेल्या अन्यायामुळे एकनाथ खडसे काहीसे नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी माध्यमांसमोर उघडपणे बोलून देखील दाखवली.तर आपण अन्याय सहन करणार नाही, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीरपणे टीका सुद्धा केली.पक्षाकडून अनेकदा डावलण्यात आल्याने एकनाथ खडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशा चर्चा रंगू लागल्या. तर आता त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश देखील निश्चित मानला जात आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यांनतर एकनाथ खडसेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे.तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर असून,खडसे यांनी यावेळी फडणवीस यांची भेट घेण्याचे टाळले आहे.त्यांनी स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित न राहता केवळ शुभेच्छा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासह आणखी कोण-कोण पक्षप्रवेश करून आपल्या हाती घड्याळ बांधणार याचीही उत्सुकता लागली आहे. दरम्यान, माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपण एकनाथ खडसे यांच्या आदेशानेच राष्ट्रवादीत प्रवेश केला, असा मोठा खुलासा केला आहे. तर अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षरीत्या सूचक इशारा भाजपला दिला आहे.