अमरावती : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत.महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने देखील ही कृषी सुशारणा विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची नाहीत, असे म्हणत याला विरोध दर्शविला आहे. असे असतानाच राज्य मंत्री बच्चू कडू यांनी मोदी सरकारने जर त्या दोन ओळी विधेयकात टाकल्या तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, असे विधान करत थेट केंद्र सरकारलाच आव्हान दिले आहे.एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू यांनी हे मोठे विधान केले.
“आमचे असे मत आहे की, विधेयकात दुरुस्ती करायला पाहिजे.आम्ही हे विधेयक जसेच्या तसे स्वीकारायला तयार आहोत. पंतप्रधान मोदी जसे ५६ इंच छाती असल्याचे सांगतात, हे आम्ही स्वीकारतो. विधेयकामध्ये केवळ दोन ओळी टाकाव्यात. शेतकऱ्यांना ५० टक्के नफा धरून भाव देऊ व याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, एवढं फक्त करा हवं तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू”, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू यांनी एकप्रकारे केंद्र सरकारला आव्हान दिले असून यापुढे ते काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दरम्यान, विरोधी पक्षाच्या विरोधाला न जुमानता लोकसभा आणि राज्यसभेत आवाजी मतदानाने कृषी विधेयके पारित करण्यात आली. काँग्रेसने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत याला विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्रात देखील विधेयकांच्या अंमलबजावणीला आमचा विरोध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्याचे नाहीत. राज्यात शेतकऱ्यांच्या कष्टाने उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचे अस्तित्व यामुळे धोक्यात येईल. त्यामुळे राज्यात विधेयकाच्या अंमलबजावणीला आमचा विरोध असल्याचे अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे.