मुंबई :
एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन लवकरच देणार असून, त्यापैकी एक महिन्याचे वेतन येत्या गुरुवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उध्दव ठाकरे यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत मी महामंडळाची आर्थिक स्थिती विषद करताना पुढील सहा महिन्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी व इतर अनुषंगिक खर्चासाठी शासनाने महामंडळाला आर्थिक मदत करावी अशी विनंती केली होती.
त्यानुसार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने १५० कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. त्यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, त्यातुन कर्मचाऱ्याचे किमान एक महिन्याचे थकित वेतन महामंडळाला देणे शक्य होईल. उर्वरित वेतनासंबंधी देखील उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजित पवार यांच्याशी माझी सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच ते वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल, असे मंत्री,परब यांनी स्पष्ट केले आहे.