अकोला : अकोल्यातील खडकी परिसरातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून हलविण्यासाठी आज युवा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ही इमारत अनधिकृत असुन महानगर पालीकेने या इमारतीवर अनधिकृत इमारत म्हणून यापूर्वी कार्यवाही सुध्दा केली आहे.या कार्यालयात येणा-या वाहनधारकांना वाहन उभी करण्यासाठी या इमारतीत पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जात आहे. याच कार्यालयाच्या बाजूनेच राज्य महामार्ग जात असल्याने या मार्गावरील जड व मोठया वाहनांच्या वर्दळीमुळे अनेक अपघात सुद्धा झाले आहेत. शासनाचे एखादे कार्यालय एखाद्या अनधिकृत इमारतीत असणे ही गंभीर बाब असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे.कोणतेही शासकीय कार्यालय भाडे तत्वावर घेण्याआधी सर्व कागदपत्र तपासून घेतली जाते. मात्र, अकोल्यातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची जागा घेतांना कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. यावेळी कार्यालय अधिकृत इमारतीत व सोयीस्कर जागेत स्थलांतरीत करावे,अशी मागणी आंदोलकांनी केली असून, दोन महिन्यात कार्यालय स्थलांतरण न केल्यास इमारत जमिनध्वस्त करण्याचा इशारा युवा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी यावेळी दिला.