अकोला (प्रतिनिधी)-
मागील काही महिन्यांमध्ये पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखा, एलसीबी यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे हिवरखेड पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून पोलीस अधीक्षकांनी हिवरखेड ठाणेदारांना पाचारण करून त्यांना चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा आहे.
हिवरखेड हे अत्यंत संवेदनशील शहर असून येथील पोलिस स्टेशनवर 48 गावे आणि लक्षावधी जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे परंतु मागील काही महिन्यांपासून येथील ठाणेदार आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर, अवैध धंदेवाईकांवर, चोरट्यांवर वचक नाहीसा झाला असून हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बहुतांश गावांमध्ये अवैध धंदे खुलेआम भरचौकात आणि प्रमुख मार्गांवर बेधडक पणे चालू आहेत. आणि त्याला हिवरखेड पोलीस स्टेशनचे “अर्थपूर्ण अभयदान” असल्याचे बोलले जात आहे. सदर अवैध धंद्यांमध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा सुद्धा समावेश असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत मोटारसायकल आणि शेती साहित्य चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. अनेक जणांनी तर पोलिसांच्या निष्क्रीयतेला कंटाळून तक्रार देण्याचे सुद्धा टाळले आहे. दाखल तक्रारी मधील चोरट्यांना पकडण्यातही हिवरखेड पोलिसांना फारसे यश आलेले नाही . प्रभावशून्य ठाणेदारांमुळे काही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचे सुद्धा मनोबल खच्चीकरण होत असल्याचे बोलले जाते.
एकीकडे एस.पी.चे विशेष पथक आणि एलसीबी यांनी अमली पदार्थ, गांजा, दारू, वरली, जुगार क्लब, गोवंश तस्करी, अश्या अनेक अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाया करून करोडो रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केला आहे. दुसरीकडे हिवरखेड पोलीस आपली उरलेली पत वाचविण्यासाठी आणि वरिष्ठांना दाखविण्यासाठी नाममात्र तीनशे, आठशे, हजार रुपये जप्तीच्या हास्यास्पद कारवाया करून स्वतःची प्रतिष्ठा जपण्याचा केविलवाणा आणि अयशस्वी प्रयत्न करीत आहेत.
एवढेच नव्हे तर हिवरखेड पोलीस स्टेशनला दलालांचा विळखा अजूनही कायम असून हे दलाल सक्रिय असून मोठमोठ्या प्रकरणांमध्ये सेटिंग करण्यात पटाईत असल्याचे बोलले जाते. त्यांचे पोलीस स्टेशन मध्ये रात्रंदिवस उठणे बसणे असून ठाण्यात त्यांना अत्यंत सन्मानाची वागणूक दिली जाते. हे दलाल नागरिकांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हिवरखेड चे ठाणेदार आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत एवढे मात्र खरे.
हिवरखेड ठाण्याचा प्रभार एलसीबी अथवा विशेष पथकाला देण्यात यावा आणि त्यांचे कार्यालय येथेच स्थापन व्हावे अशी गमतीशीर चर्चासुद्धा गावात रंगत आहे.
परंतु सर्व विषयांची गंभीरता पाहता आता पोलिस अधीक्षकांनी हिवरखेड पोलीस स्टेशन वरच सर्जिकल स्ट्राईक करण्याची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एस पी साहेबांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दबंग आणि सिंघम स्टाईल ठाणेदार नियुक्त करावे अशी मागणी जनसामान्य नागरिकांमधून होत आहे.