अकोला – बालकावर होणारे लैगीक अत्याचार तसेच परिस्थितीमुळे अल्पवयात होणारे बालविवाह, बालकामगार, काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालके व बालकांची अवैधरित्या होत असलेली विक्री यांना प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती व्हावी, यासाठी तयार करण्यात आलेल्या बॅनरचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांच्या दालनात विमोचन करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी चेके, जिल्हा परिविक्षा अधिकारी जी. के. आरवेल, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी राजू लाडुलकर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी ॲड. संगिता कोंडाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालकावर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी बालकासाठी काम करण्याऱ्या यंत्रणेने बालकाबाबत अधिकार व कर्तव्य याबाबत समाजामध्ये जास्तीतजास्त लोकापर्यंत जनजागृती करुण गुन्हेगारी प्रवृतीला आळा घालण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. या बॅनरमध्ये बालकावर होणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी बालकाकरीता काम करणाऱ्या यंत्रणे विषयक माहिती, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श, बालविवाह प्रतिबंधक कायदा व ग्राम बाल संरक्षण समितीचे कार्य याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. कार्यक्रमाचे संचालन ॲड संगिता कोंडाणे यांनी केले तर उपस्थिताचे आभार जी.के. आरवेल यांनी मानले यावेळी सुनिल लाडूलकर, सुनिल सरकटे, अनिल अहिर, सतिश राठोड, योगेद्र खंडाळे व रवत खाडे आदिची उपस्थिती होती.