मुंबई : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने १८ ते २३ सप्टेबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा घेण्यात येत असून या मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी संधी उपलब्ध झाली आहे.
उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी व लॉगइन करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या टॅबमध्ये जावून मुंबई शहर सिलेक्ट करावे.नंतर पुढे एम्पलॉयर सिलेक्ट करावा व इच्छुक रिक्त पदाकरीता अप्लाय करावे. एम्प्लॉयरकडून उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील. जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती छाया कुबल यांनी केले आहे.
विविध पदे उपलब्ध
कोरोना संकटामुळे शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या काळात काही दिवसांपासून अनेक आस्थापना, व्यवसाय,उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी शर्तीच्या अधिन राहुन कंपन्या, आस्थापना सुरु करण्यास मान्यता दिली आहे. आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत असल्याने नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मुंबई शहर जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे कॉलींग प्रोसेसर, फील्ड सेल्स, लोन प्रोसेसर, बाइकर ऑफ डिलिव्हरी, इन्शुरन्स सेल्स, रिकव्हरी मॅनेजर, पॅकर, लोडर, हेल्पर प्रमोटर, डॉक्युमेंट कलेक्शनर, टेलर, सीवींग मशिन ऑपरेटर, टेरिटरी इक्सिक्युटिव्ह, सिनिअर टेरिटरी इक्सिक्युटिव्ह, टेलीसेल्स कॉलर, इन्स्टालेशन टेक्निशिअन, ईएमआय प्रोसेसर, हाऊसकिपर, कॅश कलेक्शनर इत्यादी पदे उपलब्ध आहेत.मेळाव्यासाठी कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी ऑनलाईन पद्धतीने दूरध्वनी, भ्रमणध्वनी तसेच स्काईप आदींच्या माध्यमातून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड करणार आहेत.