औरंगाबाद : अंतिम वर्षाच्या परीक्षा या १ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत.विशेष म्हणजे यादरम्यानच १० ऑक्टोबरपासूनच निकाल लागण्यास सुरुवात होणार आहे.शिवाय अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा देखील एका महिन्यात घेतली जाणार,असल्याची महत्त्वाची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.आज पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली.
यावर अधिक बोलताना उदय सामंत म्हणाले, १ लाख १६ हजार ४०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यात ३६ हजार २०८ विद्यार्थी हे बॅकलॉगचे आहेत. ९० ते ९२ टक्के विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार असल्याची नोंद विद्यापीठाकडे झाली आहे. उर्वरित १० टक्के विद्यार्थी नजीकच्या केंद्रात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत. त्यासाठी संपूर्ण यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनातील आरोग्य, शिक्षण विभाग यांनी एकत्र येऊन महसूल आणि पोलीस विभागाला मदत केली पाहिजे, अशा सूचनाही जिल्ह्याधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे ते म्हणाले.
प्रश्न संच, मॉक टेस्ट यानंतरही काही तांत्रिक कारणांमुळे परीक्षा राहिली. तर विद्यापीठ तातडीने परीक्षा घेईल. अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तातडीने एका महिन्याच्या आत घेतली जाईल आणि त्यांनाही पदवीचे प्रमाणपत्र दिले जाईल,असे उदय सामंत म्हणाले.दरम्यान,पदवीच्या प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नसल्याची माहितीही त्यांनी यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम बाळगू नये, असे उदय सामंत म्हणाले.