आबुधाबी :
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेला आज (शनिवार) प्रारंभ होत असून, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ आणि महेेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघ सलामीच्या लढतीत आमने-सामने येणार आहेत. आयपीएलचा प्रारंभच एका हाय व्होल्टेज सामन्याने होत असल्याने चाहत्यांचे डोळेही पैसा वसून मॅच पाहण्यासाठी आसुसले आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून त्यानंतरचा हा त्याचा पहिला सामना असणार आहे. त्यामुळे त्याला खेळताना पाहण्याची उत्सुकता अनेकांना असेल.
गतविजेता मुंबईचा संघ हा कागदावर तरी मजबूत संघ दिसत आहे. रोहितशिवाय हार्दिक आणि कृणाल पंड्या, केरॉन पोलार्ड, क्विंटन-डी-कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन आदींमुळे संघाची फलंदाजी मजबूत दिसत आहे. संघाकडे ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर-नाईलसारखे गोलंदाज आहेत. तसेच, शेवटच्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीने तोंडचे पाणी पळवणार्या जसप्रीत बुमराहकडूनदेखील संघाला मोठ्या अपेक्षा असतील. यावेळी वैयक्तिक कारणांमुळे अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा संघासोबत नसेल. त्यामुळे बुमराह आणि बोल्टच्या खांद्यावर संघाची मदार असेल.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला कमी लेखून मुंबईला चालणार नाही. कारण, चेन्नईमध्ये शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, फाफ-डु-प्लेसिस व रवींद्र जडेजासारखे आघाडीचे खेळाडू आहेत. ज्यांनी संघासाठी निर्णायक कामगिरी केली आहे. चेन्नईच्या संघात अनेक वर्षे फारसा बदल झालेला नाही; पण यावेळी धोनीचा विश्वासू खेळाडूपैकी एक सुरेश रैना यावेळी संघासोबत नसणार आहे. त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाड देखील उपलब्ध नसेल. कारण, पाच वेळा हा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. असे असले तरीही संघाकडे अंबाती रायडू, केदार जाधव सारखे फलंदाज आहेत. मिचेल सॅटनेर, लुंगी एन्गिडीदेखील गोलंदाजी करण्यास सक्षम आहेत.