सातारा : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तर देणारच, अशी ग्वाही उदयनराजे यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली भूमिका मांडली.
मला सर्व समाजांप्रति आदर आहे. पण इतर समाजांप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे. मला कोणत्याही पक्षाचं लेबल लावू नका. माझी बांधिलकी लोकांशी आहे. वेळ पडली तर राजीनामा द्यावा लागला तर देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण प्रश्नी कोणीही श्रेय घेऊ नये. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय नाही मिळाला तर उद्रेक होईल. जे मी बोलतो ते मी करतो. मनाला पटतं तेचं मी करतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा समाजाला न्याय देण्यात काय अडचण? इतर समाजांना जसे आरक्षण दिले तसे मराठा समाजाला द्या. मराठ्यांना न्यायांपासून वंचित का ठेवता? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले.