नवी दिल्ली :
देशात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. कोरोनाच्या महामारीत जनतेचे संरक्षण करून, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे.
खा. राणा म्हणल्या देशात सर्वात जास्त रूग्ण संख्या महाराष्ट्रात आहे. त्यातच ऑक्सिजन सिलेंडर, पीपीइ किट, मास्क, सॅनिटीझर ,इंजेक्शन व बेड चा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने यात लक्ष घालावे. महाराष्ट्राला पंतप्रधान केअर फंडातून भरीव मदत करावी. खाजगी दवाखान्यात होणारी लूट थांबविण्यासाठी केंद्र सरकारने विशेष भरारी पथक पाठवावीत व रुग्णांची लूट करणाऱ्या खाजगी दवाखाना संचालकांना लगाम घालावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती आहे. बेडसंख्या अपुरी आहे. आयसीयूमध्ये २० रुग्णाची क्षमता असतांना ४० रुग्ण ठेवण्यात येत आहेत. आयसीयू क्षमतेच्या १० टक्के बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव आहेत. ते ५० टक्के राखीव ठेवावेत. खाजगी दवाखाने २ ते १२ लाख रुपयांपर्यंत बिल आकारून रुग्णांची सरळ लूट करीत आहेत. यामुळे गरीब रुग्णांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यांना उपचार घेणे परवडत नाही म्हणून बिचारे घरीच तडफडून मृत्यूला कवटाळत आहेत, अशी खंत खा. राणा यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्णालयात बेडची कमतरता आहे, ऑक्सिजन सिलेंडर नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर, मास्क, सॅनिटीझर आदींचा तुटवडा आहे. आवश्यक असणारी रेमेडीसिवर, टोसिली जुमेप ही इंजेक्शन काळ्या बाजारात चढ्या भावाने विकली जात आहेत. या सर्व बाबींची दखल घेऊन केंद्र सरकारने विशेष भरारी पथके (टास्क फोर्स) तयार करावीत व या बेबंदशाहीला लगाम घालावा, अशीही मागणी खा. राणा यांनी केली आहे.