मुंबई :
राज्यात लवकरच मेगा पोलिस भरती होणार आहे. पोलिस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 रिक्त पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर ही माहिती पत्रकारांना दिली. पोलिस भरतीची प्रक्रिया व वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात पोलिस दलातील सर्व साडेबारा हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती कोलमडल्यामुळे वित्त विभागाने मे महिन्यात सरकारी नोकरी भरतीला संपूर्ण स्थगिती दिली होती. त्यामुळे पोलिस भरती होणार की नाही याबाबत संदिग्धता होती.
कोरोना काळात पोलिसांची 24 तास रस्त्यावर ड्युटी
कोरोनाच्या काळात पोलिस 24 तास जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला होता.शिवाय मागील सहा महिन्यांत अनेक पोलिस कर्मचारी निवृत्त झाले आहेत. तर पुढील सहा महिन्यांत हजारो पोलिस कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या भरतीला मंजुरी देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावरची लढाई लढत असलेल्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग झालेला आहे. आजवर राज्यातील सुमारे 17 हजारांच्या आसपास पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
यातील अनेक कर्मचारी उपचार घेत आहेत. शेकडो जणांचे बळी गेले आहेत. 55 वर्षावरील पोलिसांना कार्यालयीन कामकाज देण्यात आले आहे. तर विविध आजाराचा इतिहास असलेले कर्मचारी रजेवर गेले आहेत. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत पोलिस दलाला मनुष्यबळाची कमतरता भासत असल्याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले. वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या नोकर भरती स्थगितीच्या शासन निर्णयातून पोलिस भरतीबाबत सूट देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.