अकोला(जिमाका)- कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्ह्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरील प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात बार्शीटाकळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्र, कान्हेरी सरप येथून सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपसंचालक आरोग्य डॉ. फारुखी, जिल्हा परिषदेचे कृषि सभापती पंजाबराव अढाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य गोपाल भटकर, डॉ. बोबडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिष शर्मा, तहसिलदार हमंद, ग्राम पंचायत प्रशासक रोहीदास भोयर, महिला व बालविकास अधिकारी अर्पणा उगले, जिल्हा परिषदेचे विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी तसेच मधूकर सरप, डॉ. महेश सरप, प्रतिभाताई अवचार, व ग्रामस्थाची उपस्थिती होती.
माझे कुटूंब माझी जबाबदारी हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून यामध्ये लोकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. गावातील स्थानिक प्रतिनिधीनी व स्वयंसेवकानी पुढे येवून संपूर्ण गावात सर्वेक्षण होईल यासाठी प्रत्येकाचा सहभाग नोंदवावा. यामुळे गावात असलेल्या कोमॉर्बीड रुग्ण, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, किडनी विकार इ. आजाराची वर्गवारी करुन त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर तातडीने उपचार करुन मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल. तरी या मोहिमेमध्ये जनतेनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
सर्व स्थानिक प्रतिनिधीनी आपल्या प्रभागातील नागरिकाची जबाबदारी घेवून हा आजार कमी होण्यासाठी माझे कुंटूंब माझी जबाबदारी ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांनी केले.
लोकसहभागातून हा लढा पुढे नेण्यासाठी सर्वानी सहकार्य करणे आवश्यक आहे असे सांगून आमदार अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, आपल्या कुंटूबाचे आरोग्य सांभाळणे व त्याचे रक्षण करणे हे प्रत्येकीचे आद्यकर्तव्य असून येणाऱ्या आरोग्य पथकाला योग्य माहिती देवून सहकार्य करावे व हतबल न होता हे कोरोना विरुध्दाचे युध्द जिंकायचे असल्याचे आवाहन त्यांनी केले.
आज जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामीण विभाग, तालुकास्तरावर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आपआपल्या भागात मोहिमेची सुरुवात केली असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली आहे. या पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि दोन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असतील. यासाठी जिल्ह्यात 1250 पथके तयार करण्यात आली आहे. ही पथके ग्रामीण भागातील सुमारे 2 लक्ष 50 हजार कुंटूंबापर्यंत पोहचणार आहे. यामुळे जिल्या लतील 12 लक्ष 50 हजार लोकसंख्येची तपासणी होणार आहे.
भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान, Sp०२ तपासणे तसेच Comorbid Condition आहे का याची माहिती घेण्यात येईल, ताप, खोकला, दम लागणे, Spo२ कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या Fever Clinic मध्ये संदर्भित करण्यात येईल. Fever Clinic मध्ये कोवीड-19 प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील, कोमॉर्बीड Condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीत संदर्भित केले जाईल, प्रत्येक पाच ते 10 पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देईल, घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोवीड, कोवीड आणि पोस्ट कोवीड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावुन सांगेल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.