नवी दिल्ली :
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एका विशिष्ट वातावरणात संसदेचे अधिवेशन सुरु होत असल्याचे म्हटले आहे. आपले वीर जवान सीमेवर मातृभमीच्या रक्षणासाठी मोठ्या हिंमतीने सुरक्षा देत आहेत. त्याच विश्वासाने संसदेतील सर्व सदस्य एका स्वरात, एका भावनेने देशाच्या जवानांच्या मागे देश उभे असल्याचा संदेश देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या कोरोनाचे संकट आहे आणि कर्तव्य देखील आहे. सर्व खासदारांनी कर्तव्य निवडले आहे. त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. राज्यसभा आणि लोकसभा अधिवेशन सत्राच्या वेळांत बदल केला आहे. या बदलाचा सर्व सदस्यांनी स्वीकार केला असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, जोपर्यंत लस नाही तोपर्यंत कोणतीही ढिलाई नाही. जगात कुठेही लस लवकर तयार व्हायला हवी. आमचे शास्त्रज्ञ यात यशस्वी होतील.
या सत्रात अनेक महत्वपूर्ण निर्णय होतील. अनेक विषयांवर चर्चा होईल. लोकसभेत जितकी अधिक चर्चा होईल तेवढा देशाला लाभ होईल. यावेळी देखील या महान परंपरेत सर्व खासदार व्हॅल्यू ॲडिशन करतील, असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला.