मुंबई :
दुबईहून दाऊद इब्राहिमच्या नावाने राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पलाश नरेंद्रनाथ बोस (वय 49) याला ‘एटीएस’ने अटक केली आहे. तो सायन्स पदवीधर असून, त्याची पत्नी शिक्षिका आहे. गेल्या 19 वर्षांपासून दुबईत नोकरीनिमित्त वास्तव्यास होता, त्याच्या वास्तव्याची आता महाराष्ट्र ‘एटीएस’कडून चौकशी सुरू आहे.त्याच्याकडून जप्त केलेला लॅपटॉप, मोबाईलमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पलाशने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याची कबुली दिल्याचे जुहू एटीएसप्रमुख, पोलिस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. त्याला रविवारी शिवडीतील स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून तो दाऊद इब्राहिमचा सहकारी बोलत आहे. दाऊदला उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायचे आहे, असा कॉल केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबईहून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होता. हे धमक्यांचे सत्र सुरू असतानाच संजय राऊत यांना व्हिडीओ कॉलद्वारे धमकी देण्यात आली होती. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल क्रमांक पलाशकडे होते.
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी राज्य शासनाकडून होणारा हस्तक्षेप थांबवा नाही तर परिणाम वाईट होतील, अशी धमकीच या अज्ञात व्यक्तीने संजय राऊत यांना दिली होती. त्याचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू होता. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आलेल्या धमकीनंतर महाराष्ट्र एटीएसने त्याचा समांतर तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान ते सर्व कॉल कोलकाता येथून येत असल्याचे उघडकीस आले.
पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने कोलकाता येथून पलाश बोस या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संजय राऊत यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनाही अशाच प्रकारे दाऊदच्या नावाने धमकी दिल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल, एक लॅपटॉप, एक भारतीय सिमकार्ड, तीन दुबईतील सिमकार्ड जप्त केले आहेत. लॅपटॉप आणि मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. पलाश हा कोलकाता येथील टॉलियंग, लेन क्रमांक तीन, येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होता. तो विज्ञान शाखेचा पदवीधर असून, नोकरीनिमित्त तो गेल्या 19 वर्षांपासून दुबईत होता. काही महिन्यांपूर्वीच तो दुबईहून कोलकाता येथे आला होता.
त्याची पत्नी शिक्षिका असून, दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. सुशांत प्रकरणात होणार्या हस्तक्षेपामुळे त्याने या राजकीय नेत्यांना धमकी दिल्याचे बोलले जाते. धमकी देताना तो दाऊदचा उल्लेख करीत होता, दुबईत वास्तव्यास असल्याने त्याचे दाऊदशी तसेच त्याच्या कुठल्या सहकार्याशी संबंध आला आहे का, त्याच्या गुन्हेगारी धाग्यादोर्यांबाबतही आता पोलिस तपास करीत आहेत. सोशल साईटवरून त्याने काही राजकीय नेत्यांचे मोबाईल तसेच त्यांच्या निवासातील क्रमांक मिळविले होते, त्यानंतर एका अॅपच्या माध्यमातून तो धमकी देत होता.