मुंबई :
काही करुन मराठा आरक्षण टिकेल, यासाठी आमचा सर्वांचा आग्रह आहे. आम्हाला मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. आरक्षण स्थगितीवर फेरविचार याचिका दाखल केली जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. विरोधकांना राजकारण करायचं आहे, आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
तर मराठी आरक्षण घटनापीठाकडे कसं जाईल याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र सरकारचा मराठा आरक्षण खटल्याशी संबंध नाही, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.
काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी आरक्षण स्थगितीविरोधात पुनर्विचार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
काही मंडळी जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल करीत आहेत. पण मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतरिम आहे आणि राज्य सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार आहे. त्यामुळे कोणीही निराश होऊ नये व कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. सर्वांनी संयम बाळगावा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत, हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केले आहे. गेल्या बुधवारी न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्या. हेमंत गुप्ता तसेच न्या. एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला. न्यायालयाच्या निर्णयामुळे आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.