जळगाव : आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता. पक्षात आरोप झालेल्या सगळ्यांना क्लिन चीट द्यायचे.पण मला दिली नाही,माझ्यावर एवढा राग का, असे म्हणत भाजपजे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.मला न्याय मिळत नाही तोवर मी पक्षाला प्रश्न विचारणार.मी अन्याय सहन करणारा नेता नाही,असे एकनाथ खडसेंनी आपल्या स्वपक्षीय नेत्यांना खडसावून सांगितले आहे. जळगावमध्ये पार पडलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाख खडसे’ या ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळ्या वेळी ते बोलत होते.
एकनाथ खडसे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी असलेली आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. भाजप नेत्यांनी मी चांगला असल्याचे म्हटले. मग मला तिकीट का देण्यात आले नाही. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे खडसे म्हणाले. तसेच आपण मुख्यमंत्री झालो नाही याचे दुःख नाही. मात्र उत्तर महाराष्ट्राला कधीही मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आपण पक्षाच्या विरोधात कधीच बोलणार नाही. मला जो त्रास झाला तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाला. त्यामुळे त्यांचे नाव घेतो, अशी जाहीर भूमिकाही खडसेंनी मांडली.
आपल्याला आजही अनेक पक्षांतून ऑफर येत आहेत. मात्र आपण जनतेला विचारुन निर्णय घेणार, असा थेट इशारा यावेळी एकनाथ खडसे यांनी दिला. दरम्यान एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडवीस यांच्यातील मतभेद अनेकदा समोर आले आहेत. स्वत एकनाथ खडसे यांनी प्रत्येकवेळी यावर भाष्य करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. मात्र आता त्यांनी पक्षाला देखील थेट इशारा देत, सुचक विधान केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंची पुढील भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.