मुंबई : शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’अभियान उपयुक्त ठरेल आणि त्यातुन शेतकरी चिंतामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला.
कृषी विभागामार्फत राबविण्या येणाऱ्या ‘विकेल ते पिकेल’अभियान, मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्रामकृषी विकास समिती या योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व तंत्रज्ञान सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह विविध भागांतील शेतकरी ऑनलाईन सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सध्या कोरोनामुळे वर्क फ्रॉम होमची सुविधा सगळ्यांना आहे. मात्र शेतकरी बांधवांसाठी ही सुविधा नाही. त्यांना शेतीत राबण्यावाचून पर्याय नाही. शेतकरी राबतात म्हणून जगाला अन्न मिळते. शेतात राबल्यानंतर येणाऱ्या पिकाला मातीमोल भाव मिळत असेल तर शेतकरी कसा जगणार असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ‘विकेल ते पिकेल’हे अभियान सुरु केल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांनी संघटीत होऊन गट शेतीच्या माध्यमातून ज्या मालाला बाजारपेठ आहे तो पिकविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. कृषीप्रधान देशात शेतकरी अभिमानाने उभा राहिला पाहिजे. त्यासाठी शेतातून थेट शहरातल्या घरापर्यंत अशा प्रकारची साखळी निर्माण करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात यावेत. शेतकरी संघटीत होणे गरजेचे असून शेती उद्योगक्षम होऊन अन्नदाता सुखी झाला पाहिजे अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
बाजारात कुठल्या मालाला मागणी आहे याचे नियोजन करुन महाराष्ट्रात विभागवार शेती करावी. दर्जेदार उत्पन्न घेऊन ‘विकेल ते पिकेल’ही संकल्पना यशस्वी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन वेळोवेळी निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात पाणी देण्यासाठी जावे लागू नये यासाठी दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी मा. बाळासाहेब ठाकरे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला साजेसे असे काम या योजनांच्या माध्यमातून करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.