मुंबई (वृत्तसंस्था)। अंतिम वर्षांचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर विद्यार्थ्यांना कोरोनामुळे परीक्षा घरातून कशी देता येईल यासाठी मुंबई विद्यापीठात चर्चा सुरू होती. यावर सर्व कुलगुरूंचं एकमत झालं आणि त्यासाठी MCQ पद्धतीनं परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा झाली. विद्यार्थ्यांना MCQ पेपरचा पॅटर्न लक्षात यावा यासाठी परीक्षेपूर्वी Question Bank देण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्यासोबत चर्चा झाली असून परीक्षेआधी विद्यार्थ्यांना सरावासाठी Question Bank देण्यात येईल अशी माहिती ट्वीट करून उदय सामंत यांनी दिली आहे. घरातून परीक्षा घेण्यासंदर्भात काम सुरू आहे. राज्यातल्या 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रांवर परीक्षा द्यायला जावं लागू नये यासाठी सुरक्षित आणि सोपा पर्याय निवडत आहोत, असं उच्च शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम परीक्षा घेतल्याखेरीज पदवी देऊ नये, असा निर्णय दिल्यामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत.