अकोला – देशामध्ये सर्वत्र लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यासाठी विविध फेज अंतर्गत विविध व्यवसायीकांना व्यवसाय करण्याकरिता सुट देण्यात येत असून समाजाच्या मनोरंजनाकरिता आपल्या जीवाचे रान करुन आपला जीव धोक्यात टाकून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या राजपाळणेधारक व लघु व्यवसायधारक, स्वयंरोजगार व यात्रेकरु व्यवसायधारकांना व्यवसायाची परवानगी न दिल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे.
500 लोक एकत्रित कार्य करीत असणाऱ्या कारखान्यांना मंजुरात देऊन सुरु करण्यात आले आहे. छोटे मोठे व्यवसाय करणारे सर्व व्यवसायीकांना व्यवसाय सुरु करण्याकरिता परवानगी देण्यात आली असतांना मात्र, स्वयंरोजगार प्रदर्शनी, आनंद मेला, मिना बाजार यांना सुरु करण्याकरिता अद्याप शासनाने परवानगी दिली नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊन मार्च 2020 पासून कुठल्याही प्रकारची शासकीय मदत अद्यापपर्यंत त्यांना मिळालेली नाही. ते सदैव भटकंती करुन आपली पोटाची खडगी भरत असल्यामुळे त्यांना शासनातर्फे मिळणारे रेशन कार्डापासून सुद्धा ते वंचित आहेत. कुठलीही शासकीय योजना त्यांना मिळत नाही. केवळ स्वयंरोजगार प्रदर्शनी, आनंद मेलाच्या माध्यमातून गावोगावी फिरुन ते आपला उदरनिर्वाह भागवित असतात. त्यामध्येच गेल्या मार्च 2020 पासून त्यांचे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे झुले जंगून खराब होऊन बेकार होऊ शकतात. अश्या सर्व परिस्थितीमध्ये कित्येक व्यक्तींनी आतापर्यंत आत्महत्या केल्यात व शासनाने त्यांची वेळीच खबरदारी न घेतल्यास पुन्हा कित्येक लोक आत्महत्या करतील ही सुद्धा शंका आहे.
कुठलेही दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांनी आपला संसाराचा गाडा कसा चालवावा असा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. तरी शासनाने त्यांच्या मागण्यांचा त्वरीत विचार करुन त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत देऊन व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी स्वयंरोजगार, राजपाळणे धारक व लघु व्यवसायधारक तसेच यात्रेकरु व्यवसायदारांचे वतीने आयोजक सतीष विठ्ठलराव पवार यांनी एका निवेदनाद्वारे पंतप्रधानांना केली आहे.
–