मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी धमकीचा फोन आल्या नंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला असल्याची माहिती समोर आली आहे.सत्ताधारी पक्षातील तीनही प्रमुख नेत्यांना धमकीचे फोन आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन रविवारी आला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील एक धमकीचा फोन आला असल्याची महिती समोर आली आहे. हा फोन कोणाकडून करण्यात आला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ज्यांना धमकीचे फोन आले आहेत त्यासंदर्भात क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली.त्यामुळे धमक्यांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे.
सध्या राज्यात राजकीय वातावरण अनेक कारणांवरून तापले आहे. तर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील पार पडत आहे. अशात महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांना धमकीचा फोन आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर मुख्यमंत्र्यांना आलेल्या या धमकीच्या फोनची चौकशी व्हावी अशी, मागणी महविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी केली आहे.