मुंबई : कोरोना काळात नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिल च्या मुद्दयावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अदानी ग्रुपचे सीईओ आज कृष्णकुंजवर दाखल झाले. अदानी ग्रुपचे सीईओ आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी वाढीव वीज बिल संदर्भात चर्चा केली. वाढीव वीज बिलात सूट न दिल्यास नागरिकांचा रोष पत्करावा लागेल. त्यामुळे जनभावनेचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा राज ठाकरे यांनी अदानी शिष्टमंडळांला दिला.
अदानी शिष्टमंडळ आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेविषयी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माहिती दिली आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. रोजगाराचे साधन नाही. अनेकांचे पगार कमी झालेत. अशा परिस्थितीत विजेची बिल जास्त आली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. पुढील काही दिवसांत वीज बिलात सूट न दिल्यास लोकभावनेचा उद्रेक होऊ शकतो. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल, ती कोणाच्याच हातात राहणार नाही, असे राज ठाकरेंनी अदानीच्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले.
संपूर्ण लॉकडाऊनच्या कालावधीत वीज बील कंपन्यांनी लोकांना वाढीव वीज बील पाठवले होते,या वाढीव वीज बीलाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर,आमदार राजू पाटील, अविनाश अभ्यंकर,सरचिटणीस नयन कदम,जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या शिष्टमंडळाने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाला वीज बील कमी करण्याचे आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून वीज बील कमी होत नव्हते म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या वीज बील कंपन्यांविरोधात आंदोलन तसे मोर्चे काढण्यात आले. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अदानी इलेक्ट्रिकसिटिचे मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मा व बेस्टचे मुख्य अधिकारी पाटसुते यांनी वीज दरवाढी संदर्भात भेट घेतली. त्यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई,शिरीष सावंत उपस्थित होते.लोकांची वाढीव वीज बील कमी झाली पाहिजे नाही तर तुम्हाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे यावेळी राज ठाकरे यांनी अदानी इलेक्ट्रिसिटीचे सीईओ शर्मा व बेस्टचे मुख्य अधिकारी पाटसुते यांना सुनावले सांगितले. लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांच्या रोजगार गेला असुन आर्थिक अडचणीला प्रचंड सामना करावा लागत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा लोकांच्या वाढीव वीज दरवाढीला प्रचंड विरोध आहे व वेळ पडल्यास लोकांच्या बाजूने मनसे रस्त्यावर उतरेल असे मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
दरम्यान, वाढीव वीज बिलाबाबत नागरिकांनी घेतलेल्या भूमिकेला मनसेची साथ असेल, असेही अधिकाऱ्यांना ठणकावून सांगण्यात आले आहे. याबाबत लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी अपेक्षा मनसेने व्यक्त केली आहे.