पातूर (सुनिल गाडगे) : सध्या कोरोनाचा कहर वाढत असल्याने शाळा बंद आहेत. विद्यार्थी घरी बसूनच ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे दरवर्षी साजरा होणारा शिक्षक दिन यावर्षी शाळेत साजरा होऊ शकला नाही. मात्र पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे यावर्षीचा शिक्षक दिन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासोबत विविध ऑनलाईन उपक्रम राबविणारी किड्स पॅराडाईज ही पातूर तालुक्यातील एकमेव शाळा आहे. या उपक्रमानुसार शिक्षक दिनानिमित्त एका अभिनव उपक्रमाची आखणी शाळेचे संस्थापक गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. यावर्षी विद्यार्थी घरी बसून शिक्षण घेत असून त्यांना त्यांच्या अभ्यासात आई आणि वडील मदत करीत आहेत. म्हणजेच शिक्षकाची भूमिका आई वडील सुद्धा पार पाडत आहेत. आणि पहिला गुरु ही आई असते यानुसार यावर्षी विद्यार्थ्यांनी आपल्या घरी आपल्याला अभ्यासात मदत करणाऱ्या आई वडिलांना पुष्पगुछ देऊन सन्मान केला. यावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने या उपक्रमात सहभाग घेऊन शिक्षकांना अभिवादन केले. त्याचप्रमाणे विविध स्पर्धेचे ऑनलाईन स्वरूपात आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, जयेंद्र बोरकर, तुषार नारे, सुलभा परमाळे, वंदना पोहरे, किरण दांडगे, प्रिया निमोडीया, वैष्णवी बंड, प्रणाली उपर्वट, अक्षय गाडगे, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी सहकार्य केले.












