तेल्हारा(प्रतिनिधी)- सर्वत्र कोरोना बाधित पत्रकारांची वाढती संख्या आणि त्यांची व्यवस्थेत होणारी हेडसांड टाळण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या खाजगी रुग्णालयात बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक झाली आहे. कारण, पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यावर वेळेत आणि योग्य उपचार न झाल्याने त्यांचे दुखद निधन झाले. आमचे पत्रकार बंधू रायकर यांचे निधन हा अनास्थेचा बळी असल्याची संतप्त भावना राज्यातील मध्यम जगतात उमटली आहे. रायकर यांना रुग्णवाहिका वेळेवर मिळाली असती व त्यांना ऑक्सिजन मिळाले असते तर एक तरुण मुलगा पत्रकार आपणास सोडून गेला नसता. तसेच ज्यांच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग यांचा बळी गेला त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व आरोग्य मंत्र्यांनी बुलढाणा येथील कार्यक्रमात जाहीर केल्याप्रमाणे रायकर यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत दिली जावी. यापुढे राज्यातील कोणत्याही पत्रकारावर रुग्णवाहिका मिळाली नाही, किंवा ऑक्सिजन मिळाले नाही असे वेळ येणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी हि विनंती. रायकरांच्या निधनाची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहे ती चौकशी त्वरित करावी. तसेच जबाबदारांना शासन व्हावे जेणेकरून भविष्यात कोरोना बाधित रुग्णांबाबत कोणी बेजबाबदारपणे काम करणार नाही.तसेच कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता संबंधित रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर योग्य तो उपचार होत नसल्यामुळे मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरी, त्यांच्यावर योग्य तो उपचार व्हावा अशी मागणी तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज करण्यात आली.